Thursday, June 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी जनतेची भूमिका तीच माझी भूमिका: ना. सामंत

जनतेची भूमिका तीच माझी भूमिका: ना. सामंत

कुंभवडे-सागवे बॉक्साईट प्रकल्पास पालकमंत्री उदय सामंत यांचाही विरोध

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कुंभवडे-सागवे परिसरात होऊ घातलेल्या प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून सध्या जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या विरोधानंतर आता राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकल्पाबाबत आपली महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “स्थानिक आमदार किरण सामंत यांची जी भूमिका असेल, तीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका असेल,” असे त्यांनी जाहीर केले आहे.

​प्रकल्पाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, आमदार किरण सामंत यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक नसून ती जनतेची भावना आहे. “जनतेने या प्रकल्पाला विरोध केला आहे आणि ६५ गावांच्या सभांमध्येही याविरोधात एकमताने ठराव झाले आहेत. या जनभावनेचा विचार सरकारला करावाच लागेल,” असे सामंत यांनी स्पष्ट केले.

​२० मे रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. “जनतेच्या विरोधात जाऊन जनसुनावणी करता येणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला एकप्रकारे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

​यावेळी बोलताना उदय सामंत यांनी जुन्या संदर्भांचाही पुनरुच्चार केला. बॉक्साईट प्रकल्पाचा निर्णय मागील सरकारच्या काळात झाला होता. त्यावेळीही मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि ‘जनतेने स्वीकारला तरच प्रकल्प आणावा’ या भावनेतून मी त्याला स्थगिती दिली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.

​आमदार किरण सामंत यांच्या भूमिकेला पालकमंत्र्यांचे पूर्ण समर्थन असल्याचे ना. उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्थानिक स्तरावर झालेला एकमुखी विरोध विचारात घेणार.
आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध पाऊल टाकणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. ज्या पद्धतीने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून बॉक्साईट प्रकल्पाला विरोध होत आहे, तो पाहता लोकांना जे हवे असेल तीच आमची भूमिका असेल, असे उदय सामंत यांनी ठामपणे सांगितले.