रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रदीप राजाराम देशमुख (वय ४५, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी प्रदीप देशमुख हे मुरुगवाडा स्मशानाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. ही बाब निदर्शनास आल्यावर शाहजान नदाफ (रा. शेट्येनगर, रत्नागिरी) यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
हॉस्पिटलमधील पुरुष विभागात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.११ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमधून आवश्यक ती कागदपत्रे घेतली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (अमृ. क्रमांक ८७/२०२६) नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.









