Saturday, May 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चुलत भावावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

चुलत भावावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

कोंडगाव येथे सिम कार्ड मागण्यावरून झाला वाद

संगमेश्वर:- तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे सिम कार्ड देण्याच्या किरकोळ वादातून एका दारुड्या व्यक्तीने आपल्या सख्ख्या चुलत भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंसक प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर हायवे रोडवरील श्री कुरुप यांच्या चहाच्या टपरीसमोर हा प्रकार घडला. या हल्ल्यात सिद्धेश मधुकर केळसकर (वय ३५, रा. मौजे कोंडगाव कातळवाडी, ता. संगमेश्वर) हे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांनी स्वतः याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धेश केळसकर आणि आरोपी प्रितम उर्फ पिंट्या प्रकाश केळसकर (वय ४१) हे नात्याने सख्खे चुलत भाऊ असून कोंडगाव कातळवाडी येथे एकाच घरात राहतात. आरोपी प्रितम याला दारूचे व्यसन असून तो नेहमीच फिर्यादी सिद्धेश तसेच त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना विनाकारण अश्लील शिवीगाळ करत असतो. घटनेच्या रात्री सिद्धेश हे आपल्या शेजारी राहणाऱ्या कौस्तुभ विश्वनाथ केतकर या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घरी परतत होते. ते रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव तिठा येथील कुरुप यांच्या चहाच्या टपरीसमोर आले असता, तिथे दबा धरून बसलेल्या आरोपी प्रितमने त्यांच्याकडे अचानक सिम कार्डची मागणी केली.

यावर सिद्धेश यांनी, ‘तू मला कधी सिम कार्ड दिलेच नाहीस तर मी कुठून देऊ? तुला जर दुसरे नवीन सिम कार्ड हवे असेल तर मी नंतर आणून देतो,’ असे समजावून सांगितले. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या प्रितमला या उत्तराचा प्रचंड राग आला. त्याने रागाच्या भरात शिवीगाळ करत स्वतःच्या हातातील लोखंडी रॉडने थेट सिद्धेश यांच्या डोक्याच्या मध्यभागी जोरात प्रहार केला. या अनपेक्षित आणि जबर वारामुळे सिद्धेश यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि ते जागीच कोसळले. यानंतरही आरोपीने चिडून, ‘तुझ्या आई-वडिलांना आणि तुझ्या संपूर्ण खानदानाला संपवून टाकेन,’ अशी जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आणि तो तिथून पसार झाला.

या रक्तरंजित घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी सिद्धेश यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी देवरुख पोलिसांनी २८ मे रोजी तत्परतेने पावले उचलत आरोपी प्रितम उर्फ पिंट्या प्रकाश केळसकर याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नंबर ८८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून आणि दारूच्या नशेत भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्याचा पुढील अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.