गुहागर- आरे ते पाटपन्हाळे रस्त्यावरील घटना
गुहागर:- तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी, दिनांक ३० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी सौ. अवनी समीर पागडे (वय ३६ वर्षे, रा. मु. वाकी, पो. आरे स्वातंत्र्यवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. पागडे यांचे वाकी पिंपळवट सीमेवर किराणा मालाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकान बंद करून त्या आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी आरे ते पाटपन्हाळे या रस्त्याने पायी निघाल्या होत्या. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्यांच्या जवळ आली. या दुचाकीस्वाराने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. त्याने सौ. पागडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि दुचाकीवरून पाटपन्हाळे गावाच्या दिशेने धूम ठोकली.
चोरट्याने पळवून नेलेले हे एक पदरी सोन्याचे मंगळसूत्र असून त्यामध्ये काळे व सोन्याचे मणी गुंफलेले आहेत आणि त्याला एक डवळी (वाटी) आहे. सुमारे पाच ग्रॅम वजनाच्या या जुन्या वापरत्या मंगळसूत्राची किंमत अंदाजे २५ हजार रुपये इतकी आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या सौ. पागडे यांनी तात्काळ गुहागर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ७.०८ वाजता अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कायदा ३०४ (२) अंतर्गत (गु. र. क्र. ६८/२०२६) गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आता अज्ञात गाडीचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत.









