मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील घटना
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चोरट्यांनी चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला; मात्र दुकानातील दुसऱ्या कॅमेऱ्यात संशयित कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही व्यक्तींना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
धामणी येथे भालचंद्र सप्रे यांच्या मालकीचे दुकान गाळे असून, त्यामध्ये मेडिकल, किराणा आणि हार्डवेअरची दुकाने आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर चार दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मेडिकल दुकानातील काही रक्कम चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी दुकानांचे शटर उचकटल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुकानदार आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बाहेरील कॅमेरा फोडण्यात आला असला, तरी दुकानातील दुसऱ्या कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याचे समोर आले.
दरम्यान, तुरळ परिसरात काही संशयित व्यक्ती ग्रीस लावण्याच्या बहाण्याने फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन ग्रामस्थांनी पाठलाग करत काही जणांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी ग्रामस्थांनी संशयितांना मारहाण केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि संशयितांच्या हालचालींची सखोल तपासणी करून या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विशेष म्हणजे, धामणीतील घटनेच्या रात्रीच सावर्डे येथे महामार्गालगत असलेल्या स्पेअरपार्ट दुकानाचे शटर फोडून सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. त्यामुळे धामणी आणि सावर्डे येथील चोरीच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. महामार्गालगतची दुकाने लक्ष्य करणारी फिरती चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, धामणीत पकडण्यात आलेल्या संशयितांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.









