राजापूर:- राजापूर शहरात ऑनलाईन फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाला लक्ष्य करत त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ३ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकाच्या व्हॉट्सअँपवर एका अज्ञात क्रमांकावरून एक संशयास्पद लिंक पाठवण्यात आली होती. ही लिंक उघडताच काही क्षणांतच संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून ३ लाख रुपये वळते झाले. खात्यातून पैसे कपात झाल्याचे मेसेज येताच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडित नागरिकाने तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास सुरू केला आहे.
ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.व्हॉट्सअँप किंवा एसएमएसद्वारे येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.बँक खाते,ओटीपी किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.फसवणूक झाल्यास विलंब न करता तात्काळ पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.









