कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्याने ‘अर्जुना’चा कालवा फुटला

लाखांचे नुकसान, संशयितावर गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील पाचल येथील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन फुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे जलसंपदा विभागाचे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतजमीन आणि डांबरी रस्त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पाचल येथील एका संशयिताविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अर्जुना उजवा कालवा साखळी क्र. १४३३० मीटर येथील ‘सी.आर. कम एस्केप’चे गेट आरोपी सुभाष काळे (वय ४५, रा. पाचल) याने विनापरवाना बंद केले. यामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह अडला आणि पाणी ओव्हरफ्लो झाले. पाण्याचा दाब वाढल्याने साखळी क्र. १३६०० मीटर दरम्यान सुमारे ३० मीटर लांबीचा कालव्याचा भरावाचा भाग फुटला.

मोठे आर्थिक व मालमत्तेचे नुकसान
कालवा फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह पाचल-धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि शेतजमिनीत घुसला. यामध्ये डांबरी रस्ता अंदाजे १०० मीटर लांबीचा रस्ता वाहून गेल्याने दळणवळण विस्कळीत झाले. परिसरातील शेतजमिनीत पाणी आणि गाळ शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे जलसंपदा विभागाचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

​याप्रकरणी पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग लांजाचे उपविभागीय अभियंता अमोल एकनाथ बनसोडे (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सुभााष काळे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (क), ३२६ (ख), ३२६ (ग), ३२४ (५), ३२९ (३) आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा १९८४ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.