रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे फाटा येथे किरकोळ कारणातून दोघांना धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली असून संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश कृष्णा झोरे (35, रा.वेतोशी धनगरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महेश सुरेश गोरे (38, रा.वेळवंड धनगरवाडी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी फिर्यादी महेश गोरे हे त्यांचा आतेभाउ राजेश शिंदे सोबत चिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी करबुडे फाटा येथे गेले होते. त्यावेळी संशयित जगदीश झोरेने मागील काही दिवसांपूर्वी वेतोशी गावात झालेल्या मिटिंगच्या वेळी फिर्यादी आणि त्याचा भाउ हे दोघेही गावातील इतर रहिवाशी नसताना त्या मिटिंगला उपस्थित होते या गोष्टीचा राग मनात ठेवून दोघांनाही शिवीगाळ करत होता.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी फिर्यादी महेश गोरे यांनी संशयिताला त्याबाबत विचारणा केली असता संशयिताने त्यांना बाजुला असलेल्या बंद दुकानाच्या शेडच्या लोखंडी खांबावर जोरात ढकलले. त्यामुळे त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर संशयिताने रस्त्याच्या बाजुचा दगड उचलून फिर्यादी आणि त्यांच्या भावाला जिवे ठार माण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









