Saturday, May 23, 2026
spot_img
Home संगमेश्वर आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

साखरपा:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गोवरेवाडी बसथांब्याजवळ शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शामराव साळोखे (वय ६६, रा. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH 09 EL 2608) घेऊन कोल्हापूरहून गणपतीपुळेकडे निघाले होते. रिक्षामध्ये पेढ्यांचे बॉक्स भरलेले असून गणपतीपुळे येथील दुकानदारांना माल पोहोचविण्यासाठी ते जात होते. शुक्रवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास गोवरेवाडी बसथांब्याजवळ रिक्षाचा भीषण अपघात झाला.

अपघात इतका जोरदार होता की, रिक्षाचालक रिक्षाखाली अडकून पडला होता. अपघात नेमका कसा झाला याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला रिक्षाखालून बाहेर काढून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. या प्रकरणी साखरपा पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा अधिक तपास सुरू केला आहे.