Thursday, May 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अवैध गुरे वाहतुकीची विचारणा केल्याने गोरक्षकाला पुलावरून ढकलले खाली

अवैध गुरे वाहतुकीची विचारणा केल्याने गोरक्षकाला पुलावरून ढकलले खाली

खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ अवैध जनावरांच्या वाहतुकीची विचारणा केल्याच्या रागातून दोन भावांनी एका गोरक्षकावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांना पुलावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गोरक्षक गंभीर जखमी झाले असून खेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी प्रसाद प्रकाश बर्गे (वय ३७, रा. चाकाळे हनुमान नगर) हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गोवंश तस्करी रोखण्यासाठी शोध घेत असताना, १३ मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास नारंगी फाट्याजवळ ही घटना घडली.

​यावेळी आरोपी सुरज सुनिल जाधव हा दुचाकीवरून येत असताना फिर्यादींनी त्याला थांबवले आणि “तू जनावरांची अवैध वाहतूक करतोस का?” अशी विचारणा केली. याचा राग मनात धरून सुरजने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याचा भाऊ रुतिक जाधव तिथे आला आणि त्याने रस्त्याच्या कडेला पडलेल्या लोखंडी पाईपने प्रसाद बर्गे यांच्या कमरेवर सपासप वार केले.

​मारहाण सुरू असतानाच आरोपी रुतिक जाधव याने फिर्यादींना पुलावरून खाली ढकलून दिले. यात त्यांच्या उजव्या पायाच्या टाचेला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, आरोपींनी बर्गे यांचे सहकारी प्रवीण कदम यांनाही मारहाण केली आणि “पुन्हा आडवे आलात तर जीवे ठार मारू,” अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी सुरज सुनिल जाधव (वय २५ वर्षे), रुतिक सुनिल जाधव (वय २६ वर्षे, दोन्ही रा. चिंचघर प्रभुवाडी, ता. खेड) यांच्यावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​याप्रकरणी खेड पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नारंगी फाटा परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.