Monday, October 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ३४ वर्षांनंतर फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

३४ वर्षांनंतर फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाई

रत्नागिरी:- मंडणगड पोलीस ठाण्यात सन १९९२ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील गेल्या तब्बल ३४ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘रेड्स ॲप’च्या मदतीने आरोपींच्या छायाचित्रांचे पुनर्निर्माण करून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट कर्नाटक राज्यात धडक कारवाई करत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

मंडणगड पोलीस ठाण्यात सन १९९२ मध्ये दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५/१९९२ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४२९, २८६ सह स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गेल्या ३४ वर्षांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देत फरार होते. या प्रकरणातील पाहिजे असलेल्या आरोपींचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील हुन्सूर परिसरामधून मधुराज पुटरंग पहाडी राजपूत आणि सुब्रमणी चींनाराजू पहाडी राजपूत (दोघे रा. हुन्सूर पक्षी राजपूर, राज्य कर्नाटक) या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने ताब्यात घेतले.

या तपासात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विकसित केलेले ‘रेड्स ॲप’ अत्यंत प्रभावी ठरले. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या या ॲपच्या माध्यमातून फरार व पाहिजे असलेले आरोपी तसेच बेपत्ता व्यक्तींच्या छायाचित्रांचे एकूण १०८ विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते. या गुन्ह्यातील आरोपींची छायाचित्रे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुनर्निर्मित करण्यात आली आणि स्थानिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या नेटवर्कच्या बळावर पोलिसांनी संशयितांचा अचूक माग काढून त्यांना कर्नाटकातून गजाआड केले. तब्बल तीन दशकांनंतर लागलेल्या या शोधामुळे रत्नागिरी पोलिसांच्या आधुनिक तपास पद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, पोलीस हवालदार सवाईराम, पोलीस हवालदार कदम आणि पोलीस हवालदार शेटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.