सावर्डे येथे अज्ञात चोरावर गुन्हा दाखल
सावर्डे:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे (ता. चिपळूण) हद्दीतील हॉटेल स्वामी आणि हॉटेल पंचामृत परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरचे सील व कुलूप तोडून अज्ञात चोराने १ लाख ६४ हजार २०६ रुपये किमतीचा औषधांचा साठा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० ते ५ वाजेच्या सुमारास घडली. उत्तरप्रदेश येथील देवरिया जिल्ह्यातील कपरवार येथील रहिवासी अनीस कदूस अहमद (वय २६) हे आपल्या ताब्यातील कंटेनर (क्र. GJ 15 AX 4836) घेऊन जात असताना सावर्डे येथील हॉटेल स्वामी व हॉटेल पंचामृत येथे जेवणासाठी व आरामासाठी थांबले होते.
त्यांच्या अनुपस्थितीचा आणि गाफीलपणाचा फायदा घेऊन अज्ञात चोराने कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील व लॉक तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून लबाडीच्या हेतूने आणि स्वतःच्या फायद्यासाठी १ लाख ६४ हजार २०६ रुपये किमतीच्या औषधांचे बॉक्स चोरून नेले.
या प्रकरणी फिर्यादी यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. चोरीचा हा प्रकार घडल्यानंतर तक्रार उशिरा दाखल झाल्याबाबत फिर्यादीने दिलेल्या कारणाचा पोलिसांकडून उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









