Sunday, June 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी १७ दिवसांपासून फरार असलेल्या तिघांना बेड्या

१७ दिवसांपासून फरार असलेल्या तिघांना बेड्या

खेड पोलिसांची मोठी कारवाई

खेड:- तालुक्यातील मेटे मोहल्ला येथे जुन्या भांडणातून एका ५५ वर्षीय व्यक्तीची छातीवर बुक्यांनी प्रहार करून हत्या केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना खेड पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. गेल्या १७ दिवसांपासून पोलीस चकवा देणाऱ्या या आरोपींना खेड एस.टी. स्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, ६ एप्रिल रोजी संध्याकाळी मेटे मोहल्ला परिसरातील कब्रस्तान जवळील रस्त्यावर शफी अब्दुल्ला वरवटकर (५५) आणि आरोपींमध्ये जुन्या भांडणावरून वाद झाला होता. शफी यांचे हृदयाचे बायपास ऑपरेशन झाले आहे हे माहिती असूनही, आरोपी अशरफ महामुद बोट, गणी ईस्माईल बोट आणि कादिर शमशुद्दीन घारे यांनी त्यांना शिवीगाळ करत छातीवर हाताच्या बुक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात शफी वरवटकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र हे तिन्ही आरोपी तेव्हापासून फरार होते.

आरोपी खेड शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच, खेड एस.टी. स्टँड परिसरात सापळा रचून कादिर शमशुद्दीन घारे (४८), गणी ईस्माईल बोट (५४) आणि अशरफ महामुद बोट (५५) यांना रात्री ८ च्या सुमारास अटक करण्यात आली. ही यशस्वी कामगिरी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले आणि त्यांच्या पथकाने केली आहे.