Sunday, June 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा प्रयत्न उधळला; टेम्पोसह पाच बैलांची सुटका

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा प्रयत्न उधळला; टेम्पोसह पाच बैलांची सुटका

राजापूर:- राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवून कोल्हापूरच्या दिशेने बैलांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडला. या कारवाईमुळे पाच बैलांचा जीव वाचला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास करक-कारवली रिंग रोडवर वाहतूक कमी असताना एका टेम्पोचा (क्रमांक एमएच-०९-जीजे-५२८२) संशयास्पद आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. पाचल व परिसरातील तरुणांनी तत्काळ एकमेकांना सावध केले आणि टेम्पोचा पाठलाग सुरू केला. तरुणांनी टेम्पो अडवून तो रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या ताब्यात दिला.

टेम्पोमध्ये पाच बैलांना अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आले होते. ग्रामस्थांच्या मते, जर टेम्पो वेळेवर अडवला नसता, तर गुदमरून बैलांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोच्या पुढे मार्ग दाखवण्यासाठी एक चारचाकी वाहन होते, ज्यामध्ये कथित एजंट तबरेज ठाकूर असल्याचे सांगितले जात आहे. टेम्पो पकडला गेल्याचे लक्षात येताच तबरेज ठाकूर चारचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला.

स्थानिकांच्या दाव्यानुसार, तबरेज ठाकूर याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो वारंवार गुरांची तस्करी करत असल्याचा संशय आहे. तथापि, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख आणि त्यांचे पथक पुढील तपास करत आहेत. सध्या तबरेज ठाकूरचा शोध सुरू असून टेम्पोतील इतर चार साथीदारांचीही कसून चौकशी केली जात आहे. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठा तस्करीचा प्रयत्न फसला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.