हापूससह केशर, रत्ना, सिंधु, पायरीच्या नोंदीचा मार्ग मोकळा.; काजू, नारळ, सुपारीच्या सर्व जातींचाही समावेश
रत्नागिरी:- कोकणची ओळख आणि बागायतदारांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याला ई-पीक पाहणीत स्वतंत्र ओळख मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हापूससह महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जातींची स्वतंत्र नोंद आता ई-पीक पाहणीमध्ये करता येणार आहे.राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोकणातील सर्वपक्षीय आमदार व मंत्र्याच्या मागणीची तातडीने दखल घेतली असून, यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
चालू वर्षी शासनाकडून डीसीएस ॲपद्वारे ई-पीक पाहणी केली जात आहे. मात्र, या ॲपमध्ये आंबा पिकाची नोंद करताना हापूस, केशर, रत्ना, सिंधु आणि पायरी या प्रमुख जाती स्वतंत्रपणे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात असलेल्या आंबा पिकाची अचूक नोंद करण्यात अडचणी येत होत्या. विशेषतः कोकणची ओळख असलेल्या हापूसचाच स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्याने बागायतदारांमध्ये नाराजी होती. मं मंत्रिमंडळात मंत्री सामंत यांनी यासंदर्भातला मुद्दा मांडत ही बाब निदर्शनास आणून देत ई-पीक पाहणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपमध्ये ‘कोकण रुची’ या नावाने पर्याय दिसत असल्याने इतर आंबा जाती तसेच कोकणातील अन्य फळपिकांचे सर्वेक्षण अचूकपणे होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.या मागणीची तातडीने दखल घेत शासनाने डीसीएस ॲपमध्ये आवश्यक पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
या बदलामुळे आंबा, काजू, नारळ आणि सुपारी बागायतदारांच्या पिकांची अधिक अचूक नोंद सातबारा उताऱ्यावर होण्यास मदत होणार आहे. त्याचा उपयोग पीक नुकसानभरपाई, पीक विमा, विविध शासकीय योजनांचे लाभ तसेच भविष्यातील कृषी नियोजनासाठी आवश्यक असलेली विश्वासार्ह आकडेवारी तयार करण्यासाठी होऊ शकतो.कारण हापूस ही कोकणची शान आहे आणि कोकणातील बागायतदार हा या भागाच्या अर्थकारणाचा कणा असल्याने आता कोकणातील फळबागायतदारांना न्याय मिळेल आणि ई-पीक पाहणी अधिक अचूक व पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातं आहे.मात्र राज्य सरकारने ज्या तातडीने याची दखल घेत थेट निर्णय घेतला त्याचे कोकणातील आंबा बागायतदार, शेतकरी संघटना आणि संबंधित संस्थांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.









