Tuesday, September 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने शनिवार 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास मांडवी येथील अलहमपार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासू-सासरे आणि दोन आत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (३२, रा. राजीवडा, ता. जि. रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. आशानाचा पती इम्रान याच्या घरातील नातेवाईकांचा इम्रान आणि आशनाच्या विवाहाला विरोध होता. या विरोधातूनच एप्रिल २०२६ पासून २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयशा हिला सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात होता. “तू फुकट आली आहेस, माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आण, नाहीतर आमच्या मुलाचा दुसरा विवाह करून देऊ” असे टोमणे मारत तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.
इतकेच नव्हे तर, सासरच्या मंडळींनी आशनाला घराबाहेर पडताना तिची पर्स चेक करणे, तिला कौटुंबिक कार्यक्रमांना बाहेर जाऊ न देणे,तिच्या दोन्ही लहान मुलांचा सांभाळ करू न देता मुलांना स्वतःकडे ठेवून आयशा हिला एकटीलाच माहेरी पाठवून दिले जात होते. गेल्या आठ दिवसांपासून ती आपल्या मुलांची मागणी करत होती, मात्र सासरच्या मंडळींनी तिला मुले देण्यास नकार दिला होता. या सर्व त्रासाला कंटाळून २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वा. सुमारास आशना यांनी आपला मोबाईल घरातच ठेवून राजीवडा येथील घर सोडले. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी अलहमपार्क मांडवी, रत्नागिरी येथील अपार्टमेंटच्या ‘आय’ विंगच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेनंतर तिला तातडीने उपचारांसाठी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत तिच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
या प्रकरणी पती इम्रान खलील सुवर्णदुर्गकर, सासरे खलील सुवर्णदुर्गकर, सासू नसिरा सुवर्णदुर्गकर, पतीच्या आत्या सरवरी सुवर्णदुर्गकर आणि परवीन मुनाब सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) या पाच जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक संदेश चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.