शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मांडवी भूते नाका येथे रस्ता ओलांडत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला भरधाव अज्ञाताच्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात महिला जखमी झाली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी एसटी स्टँड ते भगवती बंदर जाणारे रोडवर, मांडवी भूते नाका येथे घडला. फिर्यादी सौ. सविता सुधीर चव्हाण (वय ५४, रा. फ्लॅट नं. १०२, गणराज रेसिडेन्सी, विनम्र नगर गोडाऊन स्टॉप, नाचणे, ता. व जि. रत्नागिरी) या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून मांडवी येथे आल्या होत्या. त्यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच ०८ एडी २३४६) रहाटघर पेट्रोल पंपामध्ये उभी केली आणि ते दोघे मांडवी येथे चालत जात होते.
भूते नाका येथील चौकातील रस्ता क्रॉस करत असताना, भगवती बंदरकडून रत्नागिरी एसटी स्टँडच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ॲक्टिव्हासारख्या दिसणाऱ्या दुचाकीच्या अज्ञात चालकाने रस्त्याची परिस्थिती दुर्लक्षित करून आपली गाडी अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि वेगात चालवली. या चालकाने फिर्यादी सौ. सविता चव्हाण यांना जोराची धडक देऊन अपघात केला, ज्यामुळे त्या जखमी झाल्या.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिनांक २७ सप्टेंबर रोजी पहाटे ०३:५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, गु.र.नं. ३७४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(क), मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि जुन्या भा.द.वि.क. २७९, ३३७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.









