Tuesday, May 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी साळवीस्टॉप येथे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला कारावासाची शिक्षा

साळवीस्टॉप येथे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला कारावासाची शिक्षा

रत्नागिरी:- बांगलादेशामधून विनापरवाना भारतात प्रवेश करून रत्नागिरीतील साळवीस्टॉप येथे वास्तव्य करणाऱ्या सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल (वय 30) या महिलेला न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यभरात बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू असताना रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप येथे एक महिला बांगलादेशातून भारतात घुसून विनापरवाना रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल हिला अटक केली होती. भारतीय न्याय संहिता कलम 318, 336(3) पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3(ए), 6(ए), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14(अ) व कलम 7 प्रमाणे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या खटल्यावर सुनावणी होऊन येथील न्यायालयाने सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल हिला सहा महिने साधा कारावास, 500 रु. दंड, दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास ही शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतिश शिवलकर यांनी केला होता.