Tuesday, August 4, 2026
spot_img
Home लांजा सालपे येथे दोन दुचाकींचा अपघात; स्वार गंभीर जखमी

सालपे येथे दोन दुचाकींचा अपघात; स्वार गंभीर जखमी

लांजा:- वाटुळ ते दाभोळे मार्गावर सालपे बौद्धवाडी कमानीच्या पुढे शिपोशी बाईंग गाव चिरेखन येथे २६ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघाताप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात १ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल मुरलीधर गांगण (रा. भांबेड, ता. लांजा) असे आरोपी चालकाचे नाव आहे. तो आपली युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच ०१ एवाय ७११४) वाटुळ ते दाभोळे मार्गाने भरधाव वेगात चालवून नेत होता. यावेळी सालपे बौद्धवाडी फाटा कमानीच्या पुढे आल्यावर रस्त्याची परिस्थिती दुर्लक्षित करून त्याने आपली गाडी हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवत रस्त्याच्या उजव्या बाजूला नेली.

तेथून दाभोळे बाजूकडून येणाऱ्या एक्स ट्रिम १२५ मोटारसायकलला (क्र. एमएच ०८ बीएफ ६९७६) त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स ट्रिमवरील स्वार ओम स्वरूप भुते (रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांना गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याच्या मपोहवा उर्मिला उमेश शेडे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.