Thursday, September 17, 2026
spot_img
Home संगमेश्वर सायले येथे बिबट्याची दहशत; बंदिस्त शेडमधील ३५ कोंबड्या फस्त

सायले येथे बिबट्याची दहशत; बंदिस्त शेडमधील ३५ कोंबड्या फस्त

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात वन्यजीवांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असतानाच, सायले बौद्धवाडी येथे बिबट्याने मध्यरात्री बंदिस्त शेडमध्ये घुसून तब्बल ३५ कोंबड्या फस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनंत जयराम जाधव यांच्या पोल्ट्री शेडवर हा हल्ला झाला असून, यामुळे या नवोदित कुक्कुटपालन व्यवसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सायले बौद्धवाडी येथील अनंत जाधव यांनी घरापासून काही अंतरावर बंदिस्त शेड उभारून नव्याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. पक्षी मोठे होऊन विक्रीसाठी पूर्णपणे तयार झाले होते. मात्र, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने बंदिस्त शेडमध्ये प्रवेश केला आणि तब्बल ३५ कोंबड्या ठार करून फस्त केल्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे जाधव शेडमध्ये गेले असता, तिथे अर्धवट खाल्लेल्या कोंबड्या, पिसे, पंख आणि पायांचा खच पडल्याचे विदारक दृश्य दिसले. वर्षभराचे कष्ट डोळ्यांसमोर वाया गेल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१५ दिवसांपूर्वी करंबेळे शेवरवाडीतही घडली होती घटना; शेतकऱ्यांमध्ये घबराट

अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी करंबेळे शेवरवाडी येथेही बिबट्याने अशाच प्रकारे कोंबड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. एकीकडे जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत असताना, शेतकरी जोडधंदा म्हणून शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनाकडे वळत आहेत. मात्र, आता बिबट्यांकडून या पाळीव प्राण्यांना व पक्षांना लक्ष्य केले जात असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या हिंस्त्र बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि बाधित शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.