Friday, June 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सामाईक जागेतील झाडे तोडण्यास विरोध केल्याने मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

सामाईक जागेतील झाडे तोडण्यास विरोध केल्याने मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

राजापूर:- तालुक्यातील हर्डी, खालचीवाडी येथे सामाईक जागेतील सागवानची झाडे तोडण्यावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी सकाळी १०:१५ च्या सुमारास फिर्यादी शुभांगी सुरेश पड्यार यांच्या सामाईक जागेत आरोपी नारायण केशव पड्यार (वय ६०) हे सागवानची झाडे तोडत होते. यावेळी शुभांगी पड्यार आणि त्यांचे पती सुरेश पड्यार यांनी त्यांना झाडे तोडण्यास मज्जाव केला. याचा राग येऊन आरोपी नारायण पड्यार यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. यावेळी तिथे रोहित नारायण पड्यार, ममता नारायण पड्यार, वृषाली रमेश पड्यार आणि रिया रोशन पड्यार हे देखील आले. त्यांनी फिर्यादी, त्यांचे पती आणि त्यांच्या मुली (तृप्ती व सिद्धी) यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या झटापटीत फिर्यादींच्या छातीला व मानेला मुका मार लागला. दरम्यान, आरोपी ममता पड्यार यांनी फिर्यादी यांची मुलगी तृप्ती हिला जोराने धक्का दिल्याने ती जवळच असलेल्या चिरेबंदी बांधावर जाऊन आपटली. यामध्ये तृप्ती हिच्या डाव्या खांद्याला गंभीर मार लागला असून हाताच्या मनगटालाही जखम झाली आहे.

याप्रकरणी शुभांगी सुरेश पड्यार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात रोहित नारायण पड्यार, ममता नारायण पड्यार, वृषाली रमेश पड्यार, रिया रोशन पड्यार आणि नारायण केशव पड्यार या पाच जणांविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११५(२), ३५२, १८९, १८९(२) तसेच भा.द.वि. कलम ३२३, ५०४, १४१, १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.