शहर पोलिसांची धडक कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका एनडीपीएस रेकॉर्डवरील आरोपीला १ किलो २०१ ग्रॅम गांजासह रंगेहात पकडले. त्याच्याकडून ६० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज परशुराम नंदिवले (वय २४, सद्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी, मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर २०२६) रोजी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, नाचणकर चाळ परिसरात एक तरुण स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती व संशय आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत व ताब्क्यात १ किलो २०१ ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर असा एकूण ६०,०५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी सूरज नंदिवले हा आधीपासूनच एनडीपीएस गुन्ह्यांचा रेकॉर्डवरील ऑपरेटर असून, त्या अनुषंगाने त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही धडक कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे, नीलेश शिंगवे यांच्या पथकाने पार पाडली. शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची मोहीम अशीच कडक सुरू राहणार असल्याचे यादरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे.









