Wednesday, May 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सामाईक घराच्या वादातून काजिर्डा येथे राडा

सामाईक घराच्या वादातून काजिर्डा येथे राडा

६ नातेवाईकांवर गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील काजिर्डा (राणेवाडी) येथे सामाईक घराच्या बांधकामावरून दोन कुटुंबांतील जुना वाद उफाळून आला आहे. घराचा हिस्सा मिळेपर्यंत बांधकाम करू देणार नाही, अशी भूमिका घेत एका महिलेने तिच्या माहेरच्या मंडळींना आणि इतर नातेवाईकांना गोळा करून बांधकाम कामगारांना हाकलून लावले. इतकेच नव्हे तर मध्यस्थी करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची गाडी ढकलून देत फिर्यादीच्या सासूवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सौ. प्रिया परशुराम सावंत (वय ३२, सध्या रा. ठाणे पूर्व, मूळ रा. काजिर्डा राणेवाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी प्रिया सावंत आणि आरोपी पल्लवी मनीष सावंत यांच्यात सामाईक घरावरुन वाद सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही बाजूंच्या घराचे बांधकाम एकच कॉन्ट्रॅक्टर करत आहेत. दुपारी घराच्या पायऱ्यांचे काम सुरू असताना, फिर्यादीची चुलत जाऊ पल्लवी सावंत ही तिचे वडील आणि भावांना सोबत घेऊन हातात काठ्या घेऊन त्या ठिकाणी आली.

पल्लवी सावंत हिने काम करणाऱ्या मजुरांना धमकावत, “इथून निघा, मला माझा हिस्सा भेटल्याशिवाय मी काम करायला देणार नाही,” असे म्हणून काम बंद पाडले. तसेच सर्वांनी मिळून फिर्यादी प्रिया सावंत यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान रागाच्या भरात पल्लवी हिने फिर्यादीची सासू अनुसया सावंत यांच्या दिशेने दगड फेकून मारला, मात्र सुदैवाने तो त्यांना लागला नाही.

यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घराचे मुख्य कॉन्ट्रॅक्टर धनाजी रघुनाथ पवार हे काम पाहण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी तिथे आले. त्यावेळी पल्लवी सावंत हिने पुन्हा कॉन्ट्रॅक्टर आणि फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिने कॉन्ट्रॅक्टर पवार यांच्या गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली आणि त्यांची दुचाकी गाडी खाली ढकलून दिली. या सर्व प्रकारात उपस्थित इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी व दमदाटी केली.

याप्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रिया सावंत यांच्या तक्रारीवरून आरोपी पल्लवी मनीष सावंत, कृष्णा बाबाजी आर्डे, चंद्रकांत बाबाजी आर्डे, रमेश चंद्रकांत आर्डे, मनिषा मोतीराम सावंत आणि अमोल मोतीराम सावंत (सर्व रा. काजिर्डा राणेवाडी, राजापूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(१), १८९(२), ७९, १२५, ३५२, ३५१(१), (२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १३६/२०२६) दाखल केला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.