रत्नागिरी शहरात पोलिसांकडून सायलेन्सर जप्त
रत्नागिरी:- शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यांवर कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी अखेर कडक कारवाईचा बडगा उभारला आहे. शहर परिसरात राबवलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी १० दुचाकींचे कर्कश्य आवाज करणारे फटाका व ट्रिपल साइलेन्सर जप्त केले असून, नियम मोडणाऱ्या चालकांकडून तब्बल २९,००० रुपयांचा दंडात्मक वसूल केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या हुल्लडबाजांचे धाबे चांगलेच दाणाणले आहेत.
शहरातील मुख्य रस्ते, निवासी भाग, शाळा-कॉलेज परिसर आणि बाजारपेठेच्या ठिकाणी काही तरुण दुचाकींना बेकायदेशीरपणे मॉडिफाइड (बदललेले) साइलेन्सर लावून मोठ्या आवाजात गाड्या पळवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना या कर्णकर्कश आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये अचानक ‘नाकाबंदी’ आणि तपासणी मोहीम हाती घेतली.
तपासणीदरम्यान ज्या दुचाकींना कंपनीचे मूळ सायलेन्सर काढून बेकायदेशीर, जादा आवाजाचे मफलर बसवले असल्याचे आढळले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. वाहनांचे हे कर्कश्य सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले आणि संबंधित वाहनधारकांना दंडाचा दणका देण्यात आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषण पसरवणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. दुचाकींमध्ये बदल करून कर्कश्य आवाज काढणारे सायलेन्सर बसवणे हा बेकायदेशीर गुन्हा आहे. आगामी काळातही शहरातील विविध भागात अशी धडक मोहीम सातत्याने सुरूच राहील, असा सज्जड इशारा रत्नागिरी शहर पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या या धडक आणि सनसनाटी कारवाईचे सुजाण रत्नागिरीकरांमधून जोरदार स्वागत केले जात आहे.









