चिपळुणात वाहतुकीला अडथळा, पोलिसाशी हुज्जत केल्याप्रकरणी कारवाई
चिपळूण:- चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी करून ठेवत, वाहन बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याशी धमकीच्या स्वरूपात बोलून शिवीगाळ व हातवारे केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रितेश प्रकाश शिंदे (वय ३८, रा. पोलिस वसाहत, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अभिजित काशिनाथ महागावकर (वय ४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागावकर याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची विंगर बस (एमएच-०३-ईएस-५४६२) चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती की, ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.
दरम्यान, पोलिस कर्मचारी शिंदे हे चिपळूण शहरात गस्त घालत असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित वाहन पुढे घेण्यास सांगितले. यावेळी महागावकर याने त्यांच्याशी धमकीच्या स्वरूपात बोलत हातवारे केले तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच पोलिस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संबंधित कलमांनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.









