५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:- शहरातील खारेघाट रोड- जयस्तंभ येथे भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी दोन सदनिका फोडून ५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरु आहे. ही घटना ३१ जुलैला सकाळी साडेनऊ ते साडेअकराच्या सुमारास शकुंतला अपार्टमेंट, स्टेट बॅंकेजवळ, खारेघाटरोड, जयस्तंभ येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सिमा सुनिल साळवी (वय ६५, रा. शकुंतला अपार्टमेंट, जयस्तंभ, रत्नागिरी) या डोळे तपासणीसाठी साळवी स्टॉप येथे गेल्या असताना केवळ तीन तासाच्या अवधित चोरट्यांनी शकुंतला अपार्टमेंट मधील फिर्यादी यांच्या दर्शनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करुन त्यांच्या बेडरुमधील मुद्देमाल पळविला. तसेच फिर्यादी यांची नणंद सुनीता नंदला चौहान यांच्या बेडरुममधील ऐवज अशा दोन सदनिका फोडून चोरट्यांनी ५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. यामध्ये ३५ हजाराचे दागिने, २० हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, ४ हजाराच्या चांदीच्या वस्तू नाणे, पेला, समई, पळी, निरांजन आदींचा समावेश आहे. या प्रकरणी फिर्यादी सिमा सुनिल साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









