Saturday, May 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापुरात जमीन मोजणीवेळी हाणामारी

राजापुरात जमीन मोजणीवेळी हाणामारी

नाणार येथे भावानेच भावाला केली मारहाण

राजापूर:- जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या शासकीय मोजणीदरम्यान दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार पाळेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश दत्ताराम वालम (५५, रा. काळाचौकी, मुंबई, मूळ रा. नाणार) आणि त्यांचे भाऊ सुरेश वालम यांच्यात सामाईक जमिनीवरून जुना वाद आहे. सर्वे नं. ४९, हिस्सा नं. ६ या जमिनीबाबत हा वाद सुरू असून, फिर्यादी यांनी आपल्या भावकीसह भूमी अभिलेख कार्यालय, राजापूर यांच्याकडे जमिनीच्या शासकीय मोजणीसाठी अर्ज केला होता.

शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास शासकीय कर्मचारी जमिनीची मोजणी करत असताना, आरोपींनी मोजणीला विरोध करत फिर्यादींना लक्ष्य केले.

​मोजणी सुरू असताना आरोपींनी फिर्यादी दिनेश वालम यांना लाकडी दांडक्याने आणि हातापायाने बेदम मारहाण केली. त्यांना जमिनीवर पाडून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सुरेश दत्ताराम वालम, सुप्रिया सुरेश वालम, अश्विनी सुरेश वालम, गौरेश सुरेश वालम, निखिल शांताराम निनगे (जावई) आणि संस्कृती शैलेंद्र मांजरेकर (पाहुणी) या ६ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

​या घटनेबाबत दिनेश वालम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राजापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रात्री १० वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.