Wednesday, November 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापुरात गोवा बनावटीच्या दारूसह दुचाकी जप्त

राजापुरात गोवा बनावटीच्या दारूसह दुचाकी जप्त

८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

राजापूर:- शहरातील गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणारे रोडवर राजापूर पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी ११.१५ वाजताच्या सुमारास मोठी कारवाई केली. गैरकायदा आणि बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्याच्याकडून दारू, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ८३,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश प्रकाश वारीक (वय ३२) हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना साखळकरवाडी रस्त्यावर संशयित हालचाली आढळल्या. यावेळी आरोपी रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर) याच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीची तपासणी केली असता, त्यात अवैध गोवा बनावटीचा दारूचा साठा आढळून आला.

५०,००० रुपये किमतीची आकाशी रंगाची टीव्हीएस ज्युपिटर (क्रमांक: MH-08-BH-4768), हेवर्ड्स फाईन व्हिस्की ७,२०० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारूचे ५ बॉक्स (१८० मिलीच्या २४० बॉटल्स), मॅकडोवेल्स नं. १ ७,८२० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारूचे २ बॉक्स (१८० मिलीच्या ९२ बॉटल्स), ८,००० रुपये किमतीचा ओप्पो आणि १०,००० रुपये किमतीचा सॅमसंग असे दोन वापरते मोबाईल ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २९७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.