बोलेरो पिकअपसह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
पाचल:- राजापूर तालुक्यातील कळसवली परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या बोलेरो पिकअपमधून फिरणाऱ्या तिघांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय असलेल्या या तिघांकडून विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत गस्त सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
अमित कृष्णा बाणे, योगेश नारायण बाणे (दोघेही रा. कळसवली) आणि विजय काशिनाथ तरळ (रा. तरळवाडी, कळसवली) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी रात्री ओणी आणि कळसवली परिसरात नियमित गस्त घालत होत्या. यावेळी मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान कळसवली येथे बोलेरो पिकअपमधून फिरणारे तिघे पोलिसांच्या नजरेस पडले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. या तपासणीत त्यांच्याकडे सिंगल नळीची जुनी गावठी ठासणीची बंदूक आणि शिकारीसाठी वापरले जाणारे टॉर्च आढळून आले.
बंदूक बाळगण्यासाठी आवश्यक असलेला परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअप असा एकूण २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी नितीन घोगले यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्यातील कलम ३/२५(१)(क) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांच्यासह सागर खंडागळे, नितीन घोगले, दीपक काळे, शिवणकर, जाधव, उकारडे आणि नरूटे या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
राजापूर शहर आणि तालुक्यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत गस्त वाढविण्यात आली आहे. कळसवली येथील या कारवाईमुळे विनापरवाना शस्त्र बाळगण्याच्या प्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.









