रनपकडून कामगार कपातीचा निर्णय; ५५ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

रत्नागिरी:- आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे १८ ते २० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ५५ कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नोकरी गमवावी लागली आहे.

पालिकेच्या या अचानक निर्णयामुळे आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आणि उद्यान विभागातील २० टक्के कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. यात सर्वाधिक कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत. घंटागाडीवर काम करणाऱ्या चालकांसह ५५ कर्मचारी कमी झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामावरून कमी केलेल्या काही कर्मचाऱ्यांनी तर, अचानक रस्त्यावर आल्याने उपासमारीची वेळ आल्याचे सांगतानाच त्यांना अश्रू अनावर झाले.

कामगार कपातीमुळे शहरातील कचरा उचलणाऱ्या ६ घंटागाड्या बंद झाल्या असून, त्यामुळे कचरा उचलण्याचे वेळापत्रक विस्कटले आहे. आधीच मनुष्यबळाची कमतरता असताना, ५५ कामगार कमी झाल्याने पालिकेच्या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता, ही कपात अधिक अडचणीची ठरू शकते.

आगामी काळात गणपती, दसरा आणि दिवाळीसारखे महत्त्वाचे सण येत असताना ही कामगार कपात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र, आर्थिक शिस्त राखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे पालिकेच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.