रत्नागिरी:- तालुक्यातील केळ्ये-माजगाव येथील एका तरुणाचा ओमान देशातील सलाला येथे विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. अफिफ इरफान खल्पे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन खल्पे यांचा पुतण्या होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अफिफ हा दोन वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने ओमानमधील सलाला येथे गेला होता. आपले काम पूर्ण करून तो अवघ्या एका महिन्यात आपल्या गावी परतणार होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते; गावी परतण्याच्या काही दिवस आधीच कामावर असताना त्याला अचानक तीव्र इलेक्ट्रिक शॉक बसला ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अकल्पित आणि दुर्दैवी घटनेमुळे केळ्ये आणि रत्नागिरी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. तरुण वयातच झालेल्या या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या अफिफचा मृतदेह त्याच्या मूळ गावी आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.









