Wednesday, October 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक

भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक

मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे आणि विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवून पोलीस मुख्यालयाच्या सरकारी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना भाट्ये चेक पोस्टसमोरील रस्त्यावर घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण स्वतः गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास मोटार परिवहन विभाग, पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथील पोलीस कॉन्स्टेबल खलील नझीर करंजे (ब.नं. ६४९) हे आपल्या ताब्यातील सरकारी बोलेरो गाडीने (क्र. एमएच ०८ एएक्स ०४३३) साक्षीदारांना घेऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण कामकाज आटोपून रत्नागिरीकडे परत येत होते. त्यांचे वाहन भाट्ये पोलीस चेक पोस्टच्या पुढील रस्त्यावरून जात असताना, समोरून येणारा सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी (क्र. एमएच ०८ बीडी १७१८) चालक मिथीलेश प्रसाद मुरकर (वय २४, रा. मागलाड, ता. जि. रत्नागिरी) हा दुचाकी चालवताना थेट मोबाईल फोनवर बोलत होता. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि वाहनांची वर्दळ लक्षात न घेता, त्याने अविचाराने, हलगर्जीपणाने आणि बेदरकारपणे आपली दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आणून थेट पोलिसांच्या बोलेरो गाडीवर आदळली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार मिथीलेश मुरकर हा रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला, तसेच या अपघातात पोलिसांचे सरकारी वाहन आणि दुचाकी या दोन्ही गाड्यांचा चक्काचूर होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. अपघातानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या संपूर्ण घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद तुकाराम कांबळे (ब.नं. १२४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शहर पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी रात्री संशयित आरोपी मिथीलेश मुरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १८४(क) नुसार गुन्हा नोंद क्रमांक ४४०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.