Wednesday, October 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

रत्नागिरीत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभियांत्रिकीच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रणवीर सुरेंद्र कल्याणकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर हा मूळचा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो अभ्युदयनगर येथे घरमालक सोनाली सावंत यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याच्यासोबत अन्य दोन विद्यार्थीही राहत होते. सोमवारी (ता.२६) सकाळी दहाच्या सुमारास रणवीरला अचानक चक्कर आल्याने त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याबाबत माहिती घरमालक सावंत यांनी त्याच्या वडिलांना फोनद्वारे दिली. ही माहिती मिळताच वडील सुरेंद्र कल्याणकर हे खासगी वाहनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रणवीरवर उपचार सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास तपासून त्याला मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.