हर्षराज पाटीलवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिध्द करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 12 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वा.सुमारास करण्यात आली.
हर्षराज सुभाष पाटील (रा.मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हर्षराज पाटीलने 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त मिरजोळे पाटीलवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याबाबत फिर्यादी पोलिस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांना माहिती मिळाली होती. त्यांना व्हॉटसॲप या सोशल मिडीयावर सदरचा व्हिडिओ प्रसिध्द झाल्याचे दिसून आले. यावरुन संशयिताने मानवी जिवितास किंवा इतरांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणून दहशत माजवण्याच्या हेतूने स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून, रत्नागिरीचे अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केला. याबाबत त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 125, भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चा भंग कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









