Friday, October 30, 2026
spot_img
Home रत्नागिरी घरगुती पाणीपट्टी दरातील वाढ टळली; वाणिज्य, औद्योगिक पाणीपट्टीत वाढ

घरगुती पाणीपट्टी दरातील वाढ टळली; वाणिज्य, औद्योगिक पाणीपट्टीत वाढ

रत्नागिरी:- शहराच्या पाणी पुरवठ्यातील होणाऱ्या खर्चातील तोटा कमी करण्यासाठी पाणीपट्टीचे दर वाढवताना घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात वाढ न करण्याची विनंतीचा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला. त्यामुळे आता वाणिज्य आणि औद्योगिक पाणीपट्टीच वाढणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर यांनी त्यांच्या प्रभागातील सर्व्हिसिंग रॅम्पला चुकीच्या पद्धतीने नळजोडणी दिली असल्याकडे लक्ष वेधले. नगराध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात गुरूवारी सर्वसाधारण सभा पार पडली. सभेसमोरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले. यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या मुद्यावर यथासांग चर्चा झाली. सभेसमोर पाणी पुरवठा योजना किमान ना नफा ना तोटा या तत्वावर आणण्यासंदर्भातील विषय होता. सभापती निमेश नायर यांनी पाणी पुरवठा योजनेवर सुमारे ९ कोटी रुपये वर्षाला खर्च होत असून पाणीपट्टीच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न ४ कोटी रुपये इतकेच असल्याचे सांगितले. परंतु पाणीपट्टी दर वाढवताना घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ न करण्याची विनंती केली. सभागृहाने सर्वानुमते ही विनंती मान्य केल्याने आता वाणिज्य आणि औद्योगिक पाणीपट्टी दर वाढणार हे निश्चित झाले आहे.
सभेच्या सुरूवातीलाच स्मितल पावसकर यांनी त्यांच्या प्रभागातील एका सर्व्हिसिंग सेंटरला अनधिकृतपणे कमर्शिअल नळजोडणी दिल्याकडे आणि तेथे विना परवानगी बांधकाम केल्याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर प्रभागात २१ पथदिप बंद असताना पथदिप देखभाल दुरूस्ती करणारा ठेकेदार सांगूनही प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले. नगररचनाचे अधिकारी मुल्ला यांनी या बांधकामासंदर्भात मालकाला ३५ दिवसांची नोटीस दिल्याचे सांगितले. पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी दिलेले बेकायदेशीर नळ कनेक्शन तोडण्याच्या सूचना केल्या.

रत्नागिरी शहरातील नवीन १२ बसथांब्याना कोणती नावे द्यावीत हे त्या प्रभागातील नगरसेवकांनी सूचित करावे, असे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. यावर नवीन नावे देताना प्रवाशांचा संभ्रम होणार नाही अशी नावे असावीत, अशी सूचना नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी केली. नगर परिषदेच्या लघुउद्योग वसाहतीतील भूखंडांना मुदतवाढ देताना फेर मूल्यांकन करून देण्याचा ठराव मंजूर झाला. मागील सभेत उद्योग न सुरू झालेले भूखंड ताब्यात घेण्याबाबत काय झाले? असा सवाल भाजपा पक्षप्रतोद राजू तोडणकर यांनी उपस्थित केला. यावर मालमत्ता विभागाचे अधिकारी विजय कदम यांनी काही भूखंडधारकांनी एक वर्षाची मुदत देण्याची लेखी मागणी केली असल्याचे सांगितले.
मारूती मंदिर येथे नगर परिषदेचे पाणीपट्टी भरणा केंद्र असून तेथे घरपट्टीसुद्धा भरून घेण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना केली. नगराध्यक्षांनी ही सूचना मान्य केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवण्यासाठी इमारत बांधकामासाठी, सर्व्हिसिंग रॅम्पसाठी देण्यात आलेली एकइंची नळजोडणीची परवानगी स्थगित करण्याचा ठरावही मंजूर झाला. जुन्या बाजारपेठेतील तलाव स्वच्छ करून हे पाणी इमारत बांधकामासाठी विकण्याचा पर्याय ठेवण्यात आला. नगरसेविका सायली विकास पाटील यांनी तलावातील पाणी उपसताना आजूबाजूच्या विहिरींचे पाणी कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. अमित विलणकर, सुहेल मुकादम, राजन शेट्ये, मेधा कुलकर्णी, उपनगराध्यक्षा समीर तिवरेकर आदी नगरसेवकांनी विविध विषयांच्या चर्चेत भाग घेतला.