घटनास्थळी सापडले २० ते २५ जिवंत बॉम्ब
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसर मंगळवारी सकाळी भीषण स्फोटाने हादरला. वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५, रा. जांभारी फाटा) या महिला जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी ती हातात उचलताच जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून त्या गंभीर भाजल्या आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके नेमकी कुणी आणि कशासाठी ठेवली होती, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
जयगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बॉम्ब शोध पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून या धक्कादायक प्रकारामुळे जांभारी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.









