रत्नागिरी:- पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने उकाडा, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीने नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारा उकाडा आणि पावसाअभावी कोमेजणारी पिके, अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात रावीवारी रत्नागिरी तालुक्यांत परतीच्या पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाने पुरेशी साथ न दिल्याने शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अनिश्चिततेतून कसाबसा सावरत शेतकऱ्यांनी भातशेती फुलवली होती. आता पीक कापणीच्या उंबरठ्यावर असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाच्या तडाख्यात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाअभावी आधीच शेती संकटात असताना आता परतीचा पाऊसही नुकसानकारक ठरण्याची शक्यता असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पाणी टंचाईच्या समस्येतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.









