रत्नागिरी:- हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच पावसाळ्यातच फुलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत.
गणपतीपुळे, पावस परिसरात या कातळ भागातील हापूस आंबा कलमांना वेळेआधीच मोठ्या प्रमाणावर मोहोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा मान्सून कालावधी अनियमिततेच्या गर्तेत अडकलेला आहे. जून महिन्यातच कोरड्या दिवसांचा कालावधी अधिक होता. ऑगस्ट महिन्यातही अनेकवेळा उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. सलग दोन ते तीन दिवस पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर अचानक पडलेले कडक ऊन याचा परिणाम हापूस आंबा कलमांवर झालेला आहे. गेल्या हंगामात मे महिन्यात झाडांना आलेली पालवी जूनमध्ये परिपक्व (मॅच्युअर) झाली. आता पावसाच्या उघडीपनंतर पडलेल्या उन्हामुळे या परिपक्व पालवीतून अवकाळी मोहोर बाहेर पडत आहे. विशेषतः कातळभागातील जुन्या व नव्या कलमांवर हा मोहोर अधिक दिसून येत आहे. गणपतीपुळेसह पावस परिसरातील काही बागांमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी कुठे ना कुठे तरी कलमांना मोहोर येतो; परंतु यावर्षी हे प्रमाण अधिक असल्याचे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अवकाळी मोहोर गळून गेल्यास मुख्य हंगामाच्या वेळी झाडांना पुन्हा मोहोर येईल का, याबद्दल बागायतदारांच्या मनात मोठी शंका आहे. हवामानातील या अनियमिततेमुळे मुख्य आंबा हंगामाचे चक्र बिघडण्याची भीती असून आगामी अधिकृत आंबा मोसम पुढे ढकलला जाऊ शकतो किंवा उशिरा सुरू होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदल आणि अनिश्चित पावसाचा थेट परिणाम हापूस पिकावर होत असून, यंदा उत्पादन घटण्याची व बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
औषध फवारणी तोट्याची
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येणारा हा अवकाळी मोहोर पावसामुळे टिकून राहणे अत्यंत कठीण असते. सततचा पाऊस, हवेतील दमटपणा आणि कीड-रोगांमुळे हा मोहोर गळून जाण्याची मोठी भीती आहे. या मोहोरावर कीटकनाशकांची फवारणी करून फळधारणा टिकवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. केवळ बाजारात हंगामातील पहिला आंबा म्हणून नाव मिळवणे हा व्यावसायिकदृष्ट्या तोट्याचा सौदा ठरू शकतो. त्यामुळे बहुतांश बागायतदार या मोहोरावर फवारणी न करता त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही बागायतदार त्यावर ताडपत्री ठेवून मोहोर जपण्याचा प्रयत्न करतात.
पावसाळ्यात हापूस आंबा कलमांना मोहोर येणे हे हवामानातील अनियमिततेचे उदाहरण आहे. यंदा पावसाने अधूनमधून घेतलेल्या विश्रांती आणि त्यानंतर ऊन पडल्यामुळे झाडांना मोहोर आलेला आहे. याचा लाभ बागायतदारांना होत नाही; मात्र मोहोर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला पुन्हा पालवी आल्यास भविष्यात त्यामधून मिळणारे उत्पादन विलंबाने येईल.
–उमेश रहाटे, आंबा बागायतदार, वाटद-खंडाळा









