पाचजण ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या जयगड खाडीत कस्टम विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि मोठी कारवाई केली आहे. खोल समुद्रातून जहाजाद्वारे आणलेले तब्बल ५ हजार ५०० लीटर बेकायदेशीर डिझेल तस्करीच्या उद्देशाने घेऊन जाणारी एक संशयास्पद बोट कस्टमच्या पथकाने मध्यरात्रीच्या अंधारात रंगेहात पकडली. पुणे कस्टम्स आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी कस्टम्स डिव्हिजनने ही धडक कारवाई केली असून, या कारवाईमुळे सागरी मार्गावरील डिझेल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही व्यक्ती जयगड खाडीचा वापर करून एका मच्छीमारी बोटीतून बेकायदेशीरपणे डिझेलची तस्करी करणार असल्याची गोपनीय व विश्वासार्ह माहिती कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी तात्काळ चक्र फिरवली. खाडीच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूने कडेकोट पहारा ठेवण्यात आला, तर एका पथकाने थेट खाडीच्या पात्रात बोट घेऊन गस्त सुरू केली. मंगळवार, २६ मे च्या मध्यरात्री ठीक २:३० वाजता पडवे जेट्टीसमोरील खाडीच्या पात्रात एक संशयास्पद बोट येताना दिसली. कस्टम्सच्या पथकाने अत्यंत शिताफीने या बोटीला वेढा घातला आणि ती थांबवली.
कस्टम्स पथकाने या बोटीची तपासणी केली असता, त्यात मासेमारीचे कोणतेही साहित्य आढळले नाही. उलट, बोटीमध्ये मोठ्या पिंपांमध्ये तब्बल ५,५०० लीटर डिझेल लपवून ठेवल्याचे उघड झाले. याप्रकरणी बोटीवरील ५ कर्मचाऱ्यांना कस्टम्सने ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हे डिझेल खोल समुद्रात उभ्या असलेल्या एका मोठ्या ‘बार्ज’ किंवा ‘टगबोट’ कडून घेण्यात आले होते आणि ते रत्नागिरीच्या किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे उतरवले जाणार होते. कस्टम्सने ५,५०० लीटर डिझेल आणि तस्करीसाठी वापरलेली बोट कस्टम कायद्यांतर्गत जप्त केली असून, त्यांची अचूक किंमत ठरवण्याचे काम सुरू आहे.
या मोठ्या कामगिरीचे नेतृत्व कस्टम्सचे अधीक्षक संजय यादव यांनी केले. त्यांच्यासोबत या धाडसी मोहिमेत अधीक्षक लक्ष्मीकांत शंकर भाटकर, संदीप कौशिक, विनोद, निरीक्षक रमेश गुप्ता आणि राजेश गोपाळ लाडे, तसेच सीमन मुफिद नाखवा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









