Friday, September 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवरील खड्डे, गुरांचा प्रश्न लवकरच मार्गी

रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवरील खड्डे, गुरांचा प्रश्न लवकरच मार्गी

नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची माहिती

रत्नागिरी:- गणेशोत्सव प्रारंभ होण्यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी दिवस-रात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मोकाट गुरांचाही प्रश्न सोडवण्यासाठी दोन संस्थांशी चर्चा सुरू असून हा प्रश्नही मार्गी लावला जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून ही प्रक्रियाही लवकरच सुरू होईल असे नगराध्यक्षांनी सांगितले.

गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा यासाठी आवश्यक असणारी कामे नगर परिषदेकडून केली जात आहेत. सध्या अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित झाली असली तरी ती गणेशोत्सवानंतर सुरू होणार आहे. गणेशोत्सव काळात वाहन आणि पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी टेम्पोमधून आणलेली भाजी, फळे विकण्यासाठी साळवी स्टॉप, मंगळवार आठवडाबाजार, शनिवार आठवडाबाजार, लक्ष्मीचौक येथील मैदाने बाजारासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रस्त्यात फळभाजी विक्रीचे टेम्पो रस्त्यात उभे करून व्यवसाय करणाऱ्यांना नगर परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनाकडून बाजारासाठी उपलब्ध करून दिलेल्या मैदानाची माहिती दिली जात आहे. तरीही अशा टेम्पोवाल्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास कारवाई केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सभापती प्रिती सुर्वे, राकेश उर्फ बाबा नागवेकर, संतोष उर्फ बंटी कीर, शिवसेना गटनेते दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, भाजपा गटनेते राजू तोडणकर उपस्थित होते.
रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू असून रात्री रहदारी नसल्याने खड्डे वेगाने भरले जात असून हे काम गणेश आगमनापूर्वी पूर्ण होईल असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. फुटपाथचे सौंदर्यकरण सुरू असून ते फुटपाथ नागरिकांसाठी आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमधील माल फुटपाथवर ठेवू नये असे आवाहनही नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले आहे. गुरे पकडून त्यांची देखभाल करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. या कामासाठी दोन संस्थाही पुढे आल्या असून चर्चा सुरू आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे टेंडर झाले असून हे कामही लवकर सुरू होईल.

फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन आणि पार्कींगसाठी स्वतंत्र जागा विकसित केल्या जात आहेत. शहराच्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवल्याने पादचाऱ्यांसह इतर वाहनांनाही अडथळे येत आहेत. वाहनचालकांनी याचा विचार करून आपली वाहने योग्य पद्धतीने उभी केली पाहिजे असा सल्लाही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यावेळी दिला आहे. गणेशोत्सव काळात इतरही कोणत्या गैरसोय होवू नयेत यासाठी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. त्यानुसार बैठका होवून गणेशोत्सव काळात सोयी-सुविधा पुरवल्या जात असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.