रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील सुभाष रोड वरची आळी येथील राहत्या घरात ६५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. रविलाल देवजी पटेल (वय ६५, रा. घर नं. २३२३ अ, सुभाष रोड वरची आळी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:४६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरच्या छताला असलेल्या लाकडी वाशाला पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी बांधली. त्यानंतर गळ्यामध्ये काळ्या रंगाचा नॅपकिन गुंडाळून, त्याभोवती नायलॉन दोरीचा फास आवळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी २४ सप्टेंबर रोजी दुपारी २:१९ वाजता सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.









