Friday, September 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर जीपीएस यंत्रणा

जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर जीपीएस यंत्रणा

चालकांचे वर्तन, धावता कारभार आता अधिकाऱ्यांच्या रडारवर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता एसटीचा धावता कारभार आणि चालकांचे वर्तन थेट अधिकाऱ्यांच्या रडारवर आले आहे. वाहनाचे लोकेशन समजण्यासोबतच गाडी ठरलेल्या वेळेत सुटली किंवा पोहोचली का, कुठे अनावश्यक थांबली, दिवसभरात किती फेऱ्या झाल्या, एवढेच नव्हे, तर चालकाने गाडी विनाकारण भरधाव पळविली का किंवा रॅश ड्रायव्हिंग करून जोरात ब्रेक दाबले का, या सर्व बाबींचा अचूक डाटा आता संकलित केला जात आहे.

या डाटाच्या आधारे थेट कारवाई केली जाणार आहे. सध्या एसटी महामंडळाच्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व गाड्यांचे पूर्ण नियंत्रण अधिकारी वर्गाकडे आहे. या अ‍ॅपवरून दिवसभराची सर्व आकडेवारी व विश्लेषण स्पष्टपणे समोर येते. ज्या चालकांचे ड्रायव्हिंग धोकादायक आढळेल किंवा जे चालक वेळापत्रकाचे पालन करणार नाहीत त्यांना प्रथम समज देऊन आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

सध्या ही सुविधा केवळ अधिकाऱ्यांच्या देखरेख आणि नियंत्रणासाठी सुरू असली तरी आगामी काळात हे अ‍ॅप सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. बस नेमकी कुठे पोहोचली आहे आणि आपल्या थांब्यावर कधी येणार, याची अचूक माहिती मोबाईलवरच मिळणार आहे. शहरी १० गाड्या सोडल्या तर उर्वरित ६५५ गाड्यांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

जीपीएस प्रणालीमुळे गाड्यांच्या वेळा पाळण्यावर आणि सुरक्षेवर कडक नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. प्रवासादरम्यान अचानक गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा ब्रेकफेलसारखी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याची तत्काळ माहिती नियंत्रण कक्षाला मिळण्यास मदत होत आहे. अनुचित प्रकाराबाबत कठोर पावलेही उचलली जाणार आहेत अशी माहिती रत्नागिरीचे एसटी विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी दिली.