रत्नागिरी:- केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रत्नागिरीतील प्रथमेश गवाणकर यांनी प्रख्यात विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगातील १४ महत्त्वपूर्ण निर्णयांवर उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट आक्षेप नोंदवले असतानाही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे आवश्यक वैधानिक व कायदेशीर प्रक्रियेचे थेट उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
या याचिकेद्वारे न्यायालयात प्रमुख दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यात सुरू असलेली वादग्रस्त ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी आणि या सदोष प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून अन्यायकारकपणे वगळण्यात आलेल्या सर्व मतदारांची नावे तातडीने पुनर्स्थापित करण्यात यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मतदारांचे घटनादत्त हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









