Wednesday, May 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत

रत्नागिरी मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावराने आणि हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. विशेषतः मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

हे गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेले असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून मिरजोळे, शिळ या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. येथे अनेकदा गुरे, शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. कुत्र्यांची शिकार होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आंबा बागायतींमध्ये काम करणाऱ्या गुराख्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यातही मोठी भीती आहे. तीन वर्षांपूर्वी गावातील माळरानावर सडलेल्या अवस्थेत एक बिबट्याही आढळून आला होता. अलिकडे मिरजोळेला लागून असलेल्या खेडशी येथील डफळोळवाडी परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. या वाडीत ग्रामस्थांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी बिबट्याचा सातत्याने होणारा वावर यामुळे डफळोळवाडीतील ग्रामस्थांमध्येही प्रचंड दहशत वाढली आहे. अशावेळी सोनारवाडीतील गुरांवरील या ताज्या आणि मोठ्या हल्ल्यामुळे संपूर्ण मिरजोळे आणि लगतच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.