रत्नागिरी:- नगर पालिकेचा निधी म्हणजे जनतेचा पैसा आहे. रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या आणि प्रशासकीय कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्तीपत्रे वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात विकासकामामधील अनागोंदी कारभारावरून पालकमंत्र्यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले की, सफाई कामगारांच्या कंत्राटामध्ये मी फेरफार करून 9 कोटी रुपये वाचवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे टेंडर जाणीवपूर्वक रोखून धरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर पाच वर्षांत रत्नागिरीकरांचे 45 कोटी रुपये वाचत असतील, तर टेंडर काढण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला.
नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या निकृष्ट कामावर ताशेरे ओढत सामंत म्हणाले की, 30 ते 35 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या इमारतीत अजून निकृष्ट दर्जाचे रंगकाम आणि इतर कामे सुरू आहेत. इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर जर असे प्रकार निदर्शनास आले असते, तर थेट पोलिसांत तक्रार केली असती. तसेच, शिकलेल्या एमएससी, बीए झालेल्या मुलांना केवळ नियमाचा बडगा दाखवून सफाई कामगाराचे काम देणे योग्य नाही, त्यांच्या शिक्षणाचाही सन्मान झाला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
मालमत्ता मॅपिंगबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, शहरात मॅपिंग प्रणाली सुरू केल्यामुळे आतापर्यंत अतिरिक्त घरांचा शोध लागला आहे. संपूर्ण 32 हजार घरांचे मॅपिंग झाल्यानंतर नगरपालिकेला अतिरिक्त 12 कोटी रुपयांचा महसूल मिळेल आणि नगरपालिका स्वतःच्या पायावर उभी राहिल. यावेळी त्यांनी लाड-पागे समितीच्या माध्यमातून 13 वारसदारांना नोकरी देणारी रत्नागिरी ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका असल्याचे सांगत या निर्णयाचे कौतुक केले, परंतु प्रशासकीय गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा पुन्हा दिला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटये, सुदेश मयेकर, बाळू साळवी, प्रीती सुर्वे, सौरभ मलुष्टे, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, भाजपा नगरसेविका वर्षा ढेकणे आणि राजू तोडणकर उपस्थित होते.









