११४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- मच्छिमार्केट ते झारणी रोडवरील मच्छिमार्केट तलावाजवळ पोलिसांनी धाड टाकून विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोख रक्कमेसह मटका जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या माहितीनुसार, ही कारवाई १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मच्छिमार्केट तलावाच्या गडघ्याआडोसा, मच्छिमार्केट ते झारणी रोड जाणारा अंतर्गत रस्ता, रत्नागिरी येथे करण्यात आली. याप्रकरणी रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव प्रकाश नार्वेकर (वय ३८, पोहेको/११५३) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रोहन रविकांत घोसाळकर (वय ४०, रा. घर क्र. ८४६/५, संसारेवाडी, मास्तीमंदीर, मंगेश संसारे यांच्याकडे भाड्याने, ता. व जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रोहन घोसाळकर हा कोणत्याही परवान्याशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून नागरिकांमध्ये जुगार खेळ खेळवीत असताना पोलिसांना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि एकूण ११४४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ११४० रुपये रोख रक्कम व इतर जुगार साहित्याचा समावेश आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









