Sunday, May 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव! विकास निर्देशांकात राज्यात प्रथम

रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव! विकास निर्देशांकात राज्यात प्रथम

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याने विकासकामांत बाजी मारत राज्याच्या विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दैनिक ‘लोकसत्ता’च्या जिल्हा निर्देशांक उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विश्लेषणात रत्नागिरी जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे. या यशाबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांख्यिकी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारे, पुणे येथील नामवंत ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’ने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या विकासकामांचे सखोल विश्लेषण केले. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक प्रगती अशा विविध निकषांवर रत्नागिरी जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

​हा दिमाखदार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता ‘द ताज बाय विवांता’, कफ परेड, मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग हेदेखील उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय स्तरावर झालेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच रत्नागिरीला हा बहुमान मिळाल्याचे बोलले जात आहे.