Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी मुद्रांक विक्रीत रत्नागिरीत नवा उच्चांक; महिन्याला दीड कोटींचा महसूल

मुद्रांक विक्रीत रत्नागिरीत नवा उच्चांक; महिन्याला दीड कोटींचा महसूल

रत्नागिरी:- घर खरेदी-विक्री असो, प्रतिज्ञापत्र असो की कायदेशीर करारनामा… रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कागदोपत्री व्यवहारांना प्रचंड वेग आला आहे. कायदेशीर सुरक्षेसाठी लागणाऱ्या मुद्रांक (बाँड) खरेदीत रत्नागिरीकरांनी नवा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात दरमहा तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांच्या बाँडची खरेदी केली जात असून, वर्षाकाठी हा आकडा तब्बल १५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. कायदेशीर दस्तऐवजांची वाढती संख्या आणि नागरिकांमधील वाढती जागृतता यांमुळे या व्यवहारांना मोठी गती मिळाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात होणाऱ्या या कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये सरकारी नोटरी आणि मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प व्हेंडर) महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ९५ अधिकृत नोटरी कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून या बाँडचा वापर विविध कायदेशीर कामांसाठी केला जातो. दुसरीकडे, केवळ रत्नागिरी शहराचा विचार केला तर येथे ६ मुख्य स्टॅम्प व्हेंडर आहेत, ज्यांच्याकडून नागरिक रोज मोठ्या संख्येने बाँड खरेदी करत असतात. जमीन खरेदी-विक्री, भाडेकरार, बँक कर्ज आणि विविध शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे यामुळे मुद्रांक विक्रेते आणि नोटरी यांच्याकडे नागरिकांची रोज मोठी गर्दी पाहायला मिळते.

या कोट्यवधींच्या खरेदीचा थेट फायदा आता रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला होणार आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार, ज्या जिल्ह्यात जेवढ्या रुपयांच्या बाँडची विक्री होते, त्या एकूण रकमेच्या १ टक्का रक्कम ही थेट संबंधित जिल्हा परिषदेला दिली जाते. हा निधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील मूलभूत विकास कामांसाठी वापरण्याचा नियम आहे.
या नियमानुसार, रत्नागिरीत वर्षाला होणाऱ्या १५ कोटींच्या बाँड विक्रीतून जिल्हा परिषदेच्या तिजोरीत तब्बल १५ लाख रुपयांचा हक्काचा निधी जमा होणार आहे. हा निधी ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विकास कामांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. एकीकडे नागरिकांचे कायदेशीर व्यवहार पूर्ण होत असताना, दुसरीकडे याच व्यवहारांतून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत असल्याने या कोट्यवधींच्या बाँड खरेदीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.