रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरातील श्रीराम नगर भागात घरगुती वादातून शेजाऱ्यामध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होईल या उद्देशाने आरोपी महिलेने विंचू झाडूने उडवून फिर्यादीच्या बंगल्याच्या आत ढकलल्याप्रकरणी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास नाचणे येथील श्रीराम नगरमधील ‘सार्थ सावरी’ बंगला येथे हा प्रकार घडला. फिर्यादी स्नेहा संदीप गुरव (वय ४५, रा. घर नं. १६९१ बी, सार्थ सावरी बंगला, श्रीराम नगर, नाचणे, ता. जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रिती पद्माकर मयेकर (वय ७२, रा. बंगला नं. १६९१ ए, श्रीराम नगर, नाचणे) यांनी फिर्यादी आणि त्यांची मुलगी कु. सार्थकी गुरव यांच्या जिवाला धोका निर्माण होईल या उद्देशाने विंचू झाडूने उडवून फिर्यादीच्या बंगल्याच्या गेटच्या आत ढकलून दिला. तसेच, आरोपीने फिर्यादीच्या मुलीला अपशब्द वापरत ‘हड कुत्रे’ असे म्हणून शिवीगाळ केली.
या प्रकरणी स्नेहा संदीप गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट रोजी रात्री ८:३१ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५, ३५२, ३५१(२) नुसार आरोपी प्रिती पद्माकर मयेकर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









