Monday, May 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकडसह ४ लाखांचा ऐवज लंपास

मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकडसह ४ लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ८ हजार १९२ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १६ मे रोजी रात्री ८ ते १७ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी ओंकार रामचंद्र पाडावे (वय ३२, व्यवसाय: नोकरी, रा. मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी) यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने डाव साधला.

चोरट्याने बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून आत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर घरातील बेडरूमचा दरवाजाही अर्धवट मोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 50 हजार रुपये रोख, 2 लाख 40 हजार किमतीचे 4 तोळे 8 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 34 हजार 365 रुपये किमतीचे 6 ग्रॅम 670 मिली वजनाची सोन्याची चेन, 25 हजार किंमतीची एक सोन्याची अंगठी, 20 हजार किमतीचे सोन्याचे कानातले, 15 हजार किमतीचे सोन्याचे कानातले, 10 हजार 827 रुपये किमतीचे सोन्याचे बेबी रिंग, 10 हजार किंमतीची सोन्याची कानवेलीआणि 3000 किमतीची सोन्याची नथ असा ऐवज चोराने लंपास केला.

​या घटनेप्रकरणी फिर्यादी ओंकार पाडावे यांनी १७ मे रोजी रात्री ८:४४ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क), ३३१ (३) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे. या घरफोडीमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.